Pages

Pages

Pages

Saturday, May 30, 2020

या जगण्यावर या जन्मावर .........


*या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.......*
    या गाण्याच्या सुरावटी जेव्हा जेव्हा कानावर पडतात तेव्हा एका व्यक्तीची प्रकर्षाने आठवण होते त्या म्हणजे राजापूर तालुक्यातील गोठणे दोनीवडे केंद्राच्या केंद्रप्रमुख मा. सौ. नम्रता गुणिजन मॅडम यांची कारण तालुक्यातील किंवा केंद्रातील कोणत्याही कार्यक्रमाची सुरमई सुरुवात करायची जेव्हा त्यांना विनंती केली जायची तेव्हा त्या *बऱ्याच वेळा याच गाण्याची निवड करायच्या हे गाणं त्या केवळ गायच्याच नाहीत तर त्यांच्या जगण्याचे सार जणू या गाण्याच्या ओळीतुन त्या उलगडायच्या आणि समोरच्यालाही त्याची प्रेरणा द्यायच्या...*
         आज 31 मे 2020 रोजी खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेलं हे व्यक्तिमत्त्व नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहे.
         सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका छोट्याश्या खेडेगावातील एका छोट्या वाडीवर त्यांचा जन्म झाला तेव्हा तो भाग इतकाही विकसित झाला नव्हता की एक मुलीने शिक्षक होण्याइतपत मजल मारावी पण गुणिजन मॅडम यांनी शिक्षणाची आवड आणि कष्टाची जोड या जोरावर शिक्षक होण्यापर्यंत चा प्रवास पूर्ण केला *आणि शिक्षण क्षेत्राला समर्पण वृत्तीने काम करणारी एक शिक्षिका मिळाली*
  प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करताना आपला ठसा उमटवत असतानाच शिक्षणाच्या पुढच्या पायऱ्याही सर केल्या आणि थोड्याच कालावधीत पदवीधर शिक्षक म्हणून आपल्या शिक्षण सेवेचा दुसरा अध्याय सुरू केला. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना इंग्रजी भाषा अध्ययन अध्यापनावर कमालीचे प्रभुत्व मिळवले. या कालावधीत *शासन  स्तरावरून आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय त्याचबरोबर राज्यस्तरीय प्रत्येक प्रशिक्षणात मनापासून सहभाग नोंदवला* कोणत्याही स्तरावरील प्रशिक्षणाला स्त्रीपणाचे दुबळे कारण देऊन नाकारण्यापेक्षा संधी म्हणून स्वीकारत गेल्या आणि त्याचा उपयोग आपली शाळा विद्यार्थी , सहकारी शिक्षक आणि पर्यायाने शिक्षण व्यवस्थेला करून दिला.
      मॅडमना लहान पणापासूनच गायन आणि अभिनयाची प्रचंड आवड होती आणि या त्यांच्या आवडीला त्यांना लाभलेल्या त्यांच्या प्राथमिक शिक्षकांनी अधिक फुलवल्याचं त्या नेहमी सांगायच्या. या अभिनय आणि गायन कलेचा उपयोग त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेविषयी गोडी निर्माण करण्यासाठी अत्यंत खुबीने केला. त्यांच्या शिक्षक म्हणून कार्यरत असण्याच्या वेळेत *त्या भागातील इतर सर्व शिक्षकांसाठी इंग्रजी मराठी कवितांच्या सुंदर चालीसह सादरीकरण करणाऱ्या स्रोत होत्या असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही इतकं त्यांचं यावर प्रभुत्व आणि प्रसिद्धी होती*
       या शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या समर्पण वृत्तीने केलेल्या कामाची पोहोच पावती म्हणून जिल्हा परिषद रत्नागिरी ने त्यांना *जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार* देऊन सन्मानित केले.
          पुढे गुणिजन मॅडम यांनी *केंद्रप्रमुख* म्हणून  शिक्षण क्षेत्रातील आपल्या तिसऱ्या अध्यायाला सुरुवात केली आणि ज्या प्रामाणिक व समर्पित वृत्तीने त्यांनी एक शिक्षक म्हणून काम केलं त्याच आत्मीयतेने व झोकून देऊन केंद्रप्रमुख कारकीर्द ही पूर्ण केली.
    तसं पाहिलं तर केंद्रप्रमुख हे काम हे अत्यंत जिकिरीचे कारण 10 ते 12 शाळा त्यातील शिक्षक, विद्यार्थी तेव्हढ्या विद्यार्थ्यांचे पालक शाळा व्यवस्थापन समित्या, आणि केंद्रातील समाविष्ट गावांचे राजकीय व सामाजिक पदाधिकारी इतक्या लोकांशी संपर्क व त्यांचे प्रश्न, व यासर्वाना एकत्र बांधून शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतानाच शाळेच्या बौद्धिक व भौतिक विकासासाठी काम करताना किती तारेवरची कसरत करावी लागते हे एक केंद्रप्रमुख च जाणो पण गुणिजन मॅडमनी आपल्या केंद्रप्रमुख कारकीर्दीत या सर्वांना कधीच तक्रारीची संधी दिली नाही. गोठणे दोनीवडे केंद्रातील समाविष्ट सर्वच गावातील शाळा त्यातील शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ पालक आणि सर्व राजकीय पदाधिकारी यांच्याशी गुणिजन मॅडम यांचे आपुलकी चे नाते होते प्रत्येक गावातील शैक्षणिक व शासकीय कार्यक्रमात मॅडमना नेहमीच सन्मानाचे स्थान मिळायचे शाळेच्या विकासासाठी गावातील पदाधिकारी , ग्रामस्थ व व पालकांशी त्या नेहमीच हक्काने बोलायच्या व शाळेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना भाग पाडायच्या त्यांच्या कार्यकालावधीत  गोठणे दोनीवडे केंद्रातील शाळांनी बौद्धिक व भौतिक आघाडीवर तालुक्यात उल्लेखनीय काम केलं. प्रत्येक शाळेतील शिक्षकांशी त्यांचं नात एक प्रशासकीय अधिकारी एव्हढं मर्यादित नव्हतं तर ते आपुलकीचं, आणि एका प्रेमळ मार्गदर्शकाचं होतं. *केंद्रप्रमुख झाल्यानंतरही त्यांच्यातील प्रामाणिक शिक्षक कधीच संपला नाही कोणत्याही शाळेला भेट दिल्यानंतर त्या कधी वर्गात गेल्या नाहीत असे झाले नाही. वर्गात जाऊन त्या आपलं केंद्रप्रमुख पद विसारायच्या आणि त्यांच्यातील प्रेमळ शिक्षक जागा व्हायचा आणि अतिशय तन्मयतेने मुलांना गाणी गोष्टी शिकवायच्या , केंद्रातील जवळजवळ सर्वच शाळेतील मुलांना इंग्रजी कवितांचे  कृतीसह गायन हे त्यांच्याकडूनच मिळायच आणि सर्वच शाळेतील विद्यार्थी त्यांची आतुरतेने वाट पाहायचे*
 केंद्रातील शिक्षकांवर कधी रागावल्या नाहीत उलट शिक्षकांनी केलेल्या छोट्यातल्या छोट्या कामाचाही उल्लेख त्या अतिशय हृदयापासून करायच्या शिक्षकांचं अभिनंदन आणि गुणगान गाण्यात त्या कधीच थकायच्या नाहीत किंवा विसरायच्याही नाहीत.
     केंद्रप्रमुख गुणिजन मॅडम यांच्या कारकिर्दीतील केंद्रातील कोणताही कार्यक्रम असो तो एक कौटुंबिक कार्यक्रमच वाटायचा मग ती नेहमीची मुख्याध्यापक मीटिंग असो किंवा केंद्रास्तरीय क्रीडास्पर्धा नेहमीच चैतन्यमय आणि सर्वाना एकत्र घेऊन सर्व उपक्रम व कार्यक्रम पार पडायचे.
         राजापूर शहराच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या *गोठणे दोनीवडे* केंद्राचे केंद्रप्रमुख पद त्यांनी अतिशय मेहनतीने व जबाबदारी ने पार पडले शाळांना भेटी देताना स्त्रीत्व आणि दुर्गमता याचं कधीही अवडंबर माजवलं नाही किंवा कधी जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला नाही. कोकणातल्या प्रचंड पावसातही आपल्या छोट्याश्या दुचाकीवरून त्या शाळांना भेटी देण्यात आणि शिक्षक विद्यार्थ्याचा उत्साह वाढवण्यात कमी पडल्या नाहीत. अनेकदा त्या भिजलेल्या अवस्थेतही शाळेपर्यंत पोचायच्या आणि अनेकदा त्यांच्या गाडीचे छोटे मोठे अपघातही घडले पण यासर्वांचा त्यांच्या शैक्षणिक व्रतावर नोकरीच्या शेवटपर्यंत कोणताच परिणाम झाला नाही. घरच्या संसाराच्या जबाबदारी बरोबरच केंद्रप्रमुख म्हणून जिल्हा,तालुका या ठिकाणच्या मिटींगावर मिटिंग्ज आणि नंतर त्यासर्वांचा केंद्रातील शिक्षकांकडून फॉलोअप हे सगळं मॅडमनी विनातक्रार पार पडलं  प्रशासन आणि शिक्षक (शाळा) यामधील दुवा म्हणून काम करताना प्रसंगी मतभेदाचे प्रसंग उद्भवलेही नाही असे नाही स्त्री प्रशासक म्हणून काम करताना हाताखालच्या पुरुषी अहंकारानेही कधी कधी त्रासाचे क्षण समोर आलेही पण मॅडमनी यासर्वाना धीराने व संयमाने हाताळले.
         वैयक्तिक माझ्या शिक्षक म्हणून झालेल्या नोकरीच्या कालावधीत *आद. गुणिजन मॅडम* यांनी केंद्रप्रमुख म्हणून सन्मानाचे स्थान आहे. खरवते कोंडवाडी सारख्या दुर्गम आणि छोट्याश्या वाडीवरील एक शिक्षकी शाळेत काम करत असताना विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती आणि सर्व शालेय प्रशासकीय कामकाज आणि शेकडो किलोमीटर दूर असलेली बायको मुलं या सर्वामध्ये माझी चांगलीच फरफट व्हायची नैराश्य यायचं पण अनेकदा अशा खडतर रस्त्यावरूनही प्रवास करून मॅडमनी मला माझ्या शाळेला आणि विद्यार्थ्यांना अनेकदा धीर आणि सहकार्य केलं. समजून घेतलं आणि तिथं राहून जे काही मी थोडं फार करू शकलो त्यामध्ये माझ्या केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिणीमुळे व गुणिजन मॅडम यांच्यामुळेच शक्य झाले हे मी प्रामाणिक पणे सांगतो.

    आज मॅडम निवृत्त होत आहेत याला केवळ शासकीय नियम जबाबदार आहे कारण त्या मनानं, शरीरानं अजूनही शिक्षण क्षेत्राला खूप काही देऊ शकतात हे कोणीही नाकारू शकत नाही. एका व्रतस्थ शिक्षण प्रेमीचे निवृत्ती नंतरचे दिवस हे निश्चितच कठीण असणार कारण शाळा आणि विद्यार्थी हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि आज पासून त्या या सर्वापासून अधिकृतरित्या दुरावल्या जाणार याचा त्यांना निश्चितच त्रास हिट असणार यात शंका नाही.
       आजपर्यंत केंद्रातील सर्वांना आईच्या मायेने सांभाळणाऱ्या गुणिजन मॅडम यांचा निरोप समारंभ तितकाच अविस्मरणीय व्हावा यासाठी सध्या कार्यरत असणाऱ्या केंद्रातील शिक्षकांनी अतिशय हृदयापासून *शुभेच्छा समारंभाचे नियोजन* केले होते ज्याचे माझ्यासारख्या केंद्रातून इतरत्र बदली होऊन गेलेल्या शिक्षकांनाही आकर्षण होते पण दुर्दैवाने आज सर्वत्र कोरोनाच्या जीवघेण्या साथीमुळे आमच्या हृदयाच्या जवळच्या या कार्यक्रमाला मुकावे लागले आहे. कदाचित सर्व काही सुरळीत झाल्यावर हा कार्यक्रम होईलही पण आजचा दिवस महत्वाचा आहे आणि सकाळी जाग आल्यापासूनच माझ्या मनात यासर्व आठवणी तरळायला सुरू झाल्या आणि यालेखाच्या मदतीने त्यांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न केला. अजूनही बरंच लिहिता येईल पण तूर्तास थांबतो
       *आमच्या आदर्श केंद्रप्रमुख सौ. नम्रता गुणिजन मॅडम यांना माझ्या कडून आणि त्यांच्या कालावधीत बदलून गेलेल्या निवृत्त झालेल्या आणि सध्या कार्यरत असलेल्या माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींकडून पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा भावी काळात त्यांना समाधानी व आरोग्यदायी आयुष्य लाभो ही सदिच्छा !!*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

✍️ _*दिपककुमार कांबळे*_
माजी शिक्षक केंद्र गोठणे दोनीवडे

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

1 comment:

  1. खरंच ग्रेट पर्सन आहेत मॅडम .... कामाचा किती ही तान असला तरी अतिशय आनंदाने ते काम कसे करायचे याचे उत्तम उदाहरण मॅडम मी शिकवले. आमच्या मंदरूळ केंद्राचा चार्ज काही दिवस मॅडम कडे होता. त्यावेळी त्यांच्या उत्साही स्वभावाचा खूप जवळ जवळून अनुभव घेता आला. आदरणीय गुणीजन मॅडम ना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ����������

    ReplyDelete